मंगळवार, २९ मार्च, २०११

गुरु

कुंभारासारखा गुरु नाही रे जगात
वरी घालतो धपाटा, आत आधाराला हात

आधी तुडवी तुडवी, मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी
घट जाती थोराघरी, घट जाती राउळात

कुणी चढून बसतो गावगौरीच्या मस्तकी
कुणी मद्यपात्र होतो रावराजांच्या हस्तकी
आव्यातली आग नाही पुन्हा आठवत

कुणी पूजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ
देता आकार गुरूने ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा गुरु राहातो अज्ञात
 ---- गीत- ग. दि. माडगुळकर