परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली. पंचमहाभूते, वनस्पती, प्राणी, पक्षी त्याने निर्माण केले. त्यानंतर मनुष्य नावाचा अदभूत प्राणी त्याने निर्मिला. त्याने जणू त्याचेच प्रतिबिंब निर्मिले. मनुष्यास त्याने बुद्धी दिली आणि तो पस्तावला. तोच संकटात सापडला.... मनुष्य सतत तक्रारी करणारा, त्या निवारण्यासाठी सतत ईश्वराचा धावा करणारा, सतत बाह्य परिस्थितीला दोष देणारा.... परमेश्वर त्याला त्रासून गेला. त्याच्यापासून दूर जाण्याचे त्याने ठरविले. खूप जागा त्याने शोधल्या.....कुठे बरे लपता येईल? मनुष्याला बुद्धी दिलीय -- त्या जोरावर तो मला अखिल विश्वातून शोधून काढेल. अशी कोणती जागा आहे जिथे 'मी' खडतर प्रयत्न केल्याशिवाय सापडणार नाही? मग परमेश्वराने ठरविले, आपण मनुष्याच्या अंतरंगातच लपावे..... बुद्धी वापरून मनुष्य बाह्य जगाचा शोध घेईल पण आपल्या आत शोध घेण्याचे तो विसरेल. माझा -- या परमेश्वराचा शोध घ्यायचा असेल तर त्याला अंतर्मुख होता आले पाहिजे. तेव्हाच त्याच्यातील दैवी अंश त्याला सापडेल.