चिकाटी

नारदमुनींना एकदा संचार करत असताना एक मनुष्य अरण्यात ध्यानस्थ बसलेला दिसला. खूप दिवसापासून तो असा ध्यानस्थ बसलेला असावा, कारण त्याच्या भोवती मुंग्यांनी भलेमोठे वारूळ केले होते.
नारदाला पाहून त्या मनुष्याने विचारले," मुनिवर कुठे चालला आहात?''  नारद म्हणाले, "ईश्वराच्या भेटीला".. त्यावर तो मनुष्य म्हणाला, "माझही एक काम करा ना..... माझ्यावतीने त्या ईश्वराला विचारा ते माझ्यावर कधी कृपा करणार आहेत? मला कधी मुक्ती देणार आहेत?" .... "बर" म्हणून नारद पुढे निघाले.
पुढे त्याना आणखी एक मनुष्य दिसला. तो आनंदाने गात  होता, नाचत होता, बागडत होता. त्याने हि नारदाला विचारले, कुठे चाललात? मुनिवरांनी तेच उत्तर दिल. त्यानेही भगवंताला विचारायला सांगितले.. "मी मुक्त कधी होणार?"
कालांतराने नारद परतून त्याच वाटेने आले. प्रथम भेटलेल्या मनुष्याने त्यांना विचारले, "माझ्यासाठी काय निरोप आणलात?" ....... नारद म्हणाले, "भगवंतांनी तुला अजून चार जन्म तपश्चर्या करायला सांगितली आहे" . त्यावर तो म्हणाला, "अंगाभोवती वारूळ जमेपर्यंत तप केले, पण अजून चार जन्म बाकी आहेतच का? कधी संपणार हा प्रवास?"
नारायण.... नारायण.... म्हणत मुनिवर पुढे आले तर दुसरा मनुष्य त्यांची वाट पाहात थांबलाच होता. त्यानेहि भगवंताचा निरोप विचारला. नारदांनी सांगितले, "हे समोर जे चिंचेचे झाड आहे ना .... त्याला जितकी पाने आहेत तेवढे जन्म तुला मुक्ती साठी घ्यावे लागतील .. असा त्या परमेश्वराचा सांगावा आहे." त्यावर तो मनुष्य म्हणाला, "ठीक आहे. मी वाट पाहातो आहे त्याच्या भेटीची. आणखी थोडे दिवस मला थांबावे लावणार आहे तर! किती भाग्यवान मी! त्याची इच्छा आहे माझी भेट घेण्याची!" पुन्हा तो त्याच्या बागडण्यात मश्गुल झाला.
त्याच वेळी  आकाशवाणी झाली, "बेटा, तुला आत्ता, याच क्षणी मुक्ती देतो आहे. माझी वाट पाहाण्याची तुझी तयारी आहे, इतके जन्म चिकाटीने ... नाउमेद न होता माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याची तुझी तयारी आहे. त्या तुझ्या चिकाटीचे हे बक्षीस आहे."
जो मनुष्य मुक्तीसाठी चिकाटीने, अविरत प्रयत्न करतो, त्याला परमेश्वर प्राप्ती नक्की होते.